Belagavi

लखन निवडणूक लढविण्याबाबत सतीश जारकीहोळी साशंक !

Share

 लखन जारकीहोळी यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविण्याबाबत केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी साशंकता व्यक्त केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एखादी चांगली संधी देतो म्हटल्यावर ते उमेदवारी अर्ज मागेही घेतील असे सतीश म्हणाले.  

विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासमवेत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात आ. सतीश जारकीहोळी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही साशंकता व्यक्त केली. ते म्हणाले, बंधू लखन यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच उदभवत नाही. कारण निवडणूक पक्षीय पातळीवर लढविल्या जातात, कौटुंबिक पातळीवर नव्हे. ही काही जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर कुटुंबातील लढाई नव्हे. आम्ही जारकीहोळी एकीकडे आहोत. पण भावा-भावात वाद असू शकतात, राजकीय वादही असू शकतात. उद्या जर भाजप नेतृत्वाने लखन याना चांगली संधी देतो असे सांगितले तर ते आपली उमेदवारी मागेही घेतील असा उपहास आ. सतीश जारकीहोळी यांनी केला.

एव्हाना काँग्रेस उमेदवारासाठी अर्धा मतदारसंघ पिंजून काढला आहे. काँग्रेसतर्फे ‘सिंगल उमेदवार, सिंगल मत’ असा प्रचार करत आहोत. पक्षाच्या मुद्यावर निवडणूक लढवीत आहोत. काँग्रेसचा उमेदवार जिंकला पाहिजे. लोकसभा पोटनिवडणुकीत माझ्याविरोधात पैसे वाटून माझा पराभव करण्यात आला. ते दुःख मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना आहे असे आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

रमेश जारकीहोळी नेहमीच गंभीर असतात. ते कधी थंड असतात हे तुम्ही-आम्ही कधीच पाहिलेले नाही. भाजपमधून दोघे लढताहेत. हे आव्हान त्यांना आहे. आमच्याकडे कसलाही गोंधळ नाही. ‘सिंगल उमेदवार, सिंगल मत’ इतकेच आहे असे जारकीहोळी यांनी सांगितले.

एकंदर, जारकीहोळी ब्रदर्स आणि हेब्बाळकर कुटुंबात विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जुंपली आहे. यात कोण जिंकणार, कोण हरणार हे पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

Tags: