Banglore

बेंगळूरमधील अतिवृष्टी परिसरात मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

Share

सिलिकॉन सिटी बंगळुरूमध्ये अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवली आहे. या आपत्कालीन परिस्थितीला बेंगळूरमधील जनता वैतागली आहे. अपार्टमेंट, जवाहरलाल नेहरू संशोधन केंद्र आदी भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

बेंगळूर मधूला यलहंक परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या परिसराला आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भेट दिली. यावेळी विहार अपार्टमेन्टला भेट देऊन सभोवतालच्या तलावांची नकाशाच्या आधारे अधिकाऱ्यांकडून माहिती घटली. यलहंक येथील परिसरातील तलावांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाट करून देण्यात येईल, असा भरवसा मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना दिला. यांनतर जवाहरलाल नेहरू वैज्ञानिक संशोधन केंद्रालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.

यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या ३ दिवसांपासून या परिसरात होत असलेल्या पावसामुळे घराघरात पाणी शिरले आहे. तसेच केंद्रीय विहार अपार्टमेंटलादेखील पावसाचा तडाखा बसला आहे. यलहंकचे आमदार विश्वनाथ हे नागरिकांच्या मदतीला धावून आले. या परिसरात असलेले ११ तलाव पावसामुळे ओसंडून वाहात होते. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे तलाव भरले असून पावसाचा जोर ओसरल्यावर रुंदीकरणासंदर्भात सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

त्याचप्रमाणे जक्कुर परिसरात असलेल्या एओएमएस कॅम्पस देखील तुडुंब भरला आहे. लॅब आणि सर्व्हर रूमची तपासणी मुख्यमंत्र्यांनी केली असून कोट्यवधींच्या यंत्रसामुग्रीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅम्पस पाहणीनंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आओखा राव यांची भेट घेतली. तसेच सीएनआर राव कक्षात मुख्यमंत्र्यांनी संशोधन केंद्रातील नुकसानावर चर्चा केली.

 

Tags: