Vijayapura

नवरसपूर उत्सवाला पुन्हा ब्रेक : उत्सव साजरा करण्यासाठी जनता आतुर

Share

राज्याचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आणि जोपासण्यासाठी प्रत्येक वर्षी जिल्हास्तरावर उत्सवाचे आयोजन केले जाते. विजापूर जिल्ह्यातदेखील नवरसपूर उत्सवाचे आचरण केले जाते. परंतु गेल्या पाच वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्यात आला नसून या भागातील जनता उत्सव साजरा करण्यासाठी आतुर झाली आहे. सदर उत्सव कधी साजरा करायचा हा प्रश्न या भागातील जनता विचारत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून नवरसपूर उत्सवाचे आयोजन करण्यात आले नाही. अतिवृष्टी, महापूर या कारणामुळे आधीच तीन वर्षे स्थगित झालेला हा उत्सव पुन्हा कोरोना परिस्थितीमुळे साजरा करण्यात आला नाही. एकूण पाच वर्षे सतत या उत्सवाची परंपरा खंडित झाली असून यंदाही हा उत्सव साजरा करण्यासंदर्भात कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. यामुळे येथील जनता हा उत्सव कधी साजरा होणार याची प्रतीक्षा करत आहे. (फ्लो)

दरवर्षी हा उत्सव कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीच्या साहाय्यातून करण्यात येतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात या उत्सवासाठी खर्च देखील जमा करण्यात येतो. परंतु हा उत्सव साजरा करण्यासाठी कोणाचीही इच्छा नसल्याचे जाणवत असून जनता मात्र नवरसपूर उत्सव साजरा करण्यासाठी आतुर झाली आहे. या उत्सवासंदर्भात आमच्या इन न्यूजशी संवाद साधताना कन्नड संघटनेचे नेते प्रकाश कुंभार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहुयात…

नवरसपूर उत्सवामध्ये स्थानिक कलाकार, राज्य आणि देशभरातील कलाकारांना संधी देण्यात येते. या उत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. या उत्सवादरम्यान साजऱ्या होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात विजापूरमधील जनता हिरीरीने सहभाग घेते. देशभरातील विविध भागातील संस्कृती, जीवनशैली या उत्सवादरम्यान पहायला मिळते. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. परंतु गेल्या पाच वर्षात हा उत्सव साजरा करण्यासाठी कोणतीच हालचाल दिसत नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा युवापरिषदेचे अध्यक्ष शरणु सबरद यांनी दिली आहे.

यापूर्वी फेब्रुवारी २०१५ मध्ये विजापूरमधील गोलघुमट परिसर, बाराकमान परिसर, तोरवी भाग, ललित महल गार्डन या परिसरात भव्य मंडप आणि व्यासपीठ उभारले जाते. एकाचवेळी दररोज सायंकाळी भव्य उत्सवाचे आचरण केले जाते. सध्या विजापूरमधील जनता हा भव्य दिव्य उत्सव पाहण्यासाठी आतुरली असून खंडित झालेला नवरसपूर उत्सव पुन्हा एकदा सुरु व्हावा, अशी मागणी करत आहे.

*विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर

Tags: