गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड हालकेरे येथील श्री अन्नदानेश्वर संस्थान मठाचे अभिनव अन्न्दानेश्वर डॉ. संगनबसव स्वामीजी यांच्या निधनावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शोक व्यक्त केला आहे.

गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड हालकेरे येथील श्री अन्नदानेश्वर संस्थान मठाचे अभिनव अन्न्दानेश्वर डॉ. संगनबसव स्वामीजी यांचे बेंगळूर येथील खासगी इस्पितळात सोमवारी पहाटे निधन झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इस्पितळाला भेट देऊन स्वामीजींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन शोक व्यक्त केला.
होसपेटे, बळ्ळारी कोट्टुर स्वामीमठ, श्रीमठ शिवयोगी मंदिराचे अध्यक्ष असलेल्या डॉ. अभिनव अन्न्दानेश्वर संगनबसव स्वामीजी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. बेंगळुरातील खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांचा उपयोग न होता, सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. स्वामीजींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यावर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, डॉ. अभिनव अन्न्दानेश्वर संगनबसव स्वामीजी यांनी अनेक वर्षे राज्याची संस्कृती-परंपरांचे आणि लिंगायत धर्माच्या रक्षणासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे भक्तसमुदाय पोरका झाला आहे. देव त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो, त्यांच्या भक्तांना हे दुःख पचविण्याची शक्ती देवो. काही दिवसांपूर्वीच हालकेरे मठाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी त्यांना इतक्या लवकर आपण गमावू ही कल्पनाही आली नव्हती. त्यांच्या निधनाने माझे मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.
यावेळी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, मंत्री सी. सी. पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments