Belagavi

ज्येष्ठ नागरिक कल्याण संघाची बैठक : ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी परतफेडीला प्राधान्य देण्याची मागणी

Share

संगोळी रायन्ना अर्बन सहकारी पतसंस्थेत ठेवण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींची परतफेड करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असा आग्रह आज ज्येष्ठ नागरिक कल्याण संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आला.

बेळगावमधील सरदार मैदानावर ज्येष्ठ नागरिक असोसिएशनच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिवाळखोरीत निघालेल्या पतसंस्थेत ठेवण्यात आलेल्या ठेवींच्या परतफेडीसंदर्भात चर्चा करण्यात आली. सदर पतसंस्थेशी संबंधित मालमत्ता आधीच जप्त करण्यात आली असून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी पावले उचलली आहेत. या प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींची परतफेड करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

यासंदर्भात आमच्या इन न्यूजच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले कि, सदर पतसंस्थेत ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यात आलेली रक्कम हि माझ्या कमाईची रक्कम होती. माझी रक्कम मला अद्याप मिळावी नसून माझ्या उपजीविकेची अडचण निर्माण झाली आहे. संस्थेची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या माध्यमातून सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी परतफेड करण्यात याव्यात, अशी मागणी आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर निवृत्त कर्मचारी ए. एस. सिगनळ्ळी यांनीही आमच्या वाहिनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. संगोळी रायन्ना, भीमाम्बिका आणि खजराज या पतसंस्था बंद झाल्या आहेत. या संस्थेच्या अध्यक्षांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या रक्कम परत करण्याचा आदेश देण्यात आला असून आगामी अधिवेशनात सदर ठेवींची परतफेड करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. यासंदर्भात लक्ष न पुरवल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

याचसंदर्भात आणखी एका ज्येष्ठ नागरिकाने प्रतिक्रिया देताना सांगितले कि, सरकारच्या आदेशानुसार संस्थेच्या अध्यक्षांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम परतफेड करण्याचे सांगितले आहे. सरकारने या प्रक्रियेत सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी परतफेडीसाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन आपण करत असल्याचे ते म्हणाले.

सरकारने यापूर्वीच संबंधित संस्थांच्या अध्यक्षांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आपले पैसे सर्वप्रथम दिले जावेत, जेणेकरून उतारवयात आपला पैसा अडीअडचणींसाठी उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी या बैठकीत व्यक्त केली आहे.

Tags: