Belagavi

भाजप विधान परिषदेत बहुमत मिळवेल : येडियुरप्पा

Share

१५हुन अधिक जागा मिळवून भाजप विधान परिषदेत बहुमत मिळवेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

भाजपच्या जनस्वराज यात्रेत भाग घेण्यासाठी आले असता, पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, विधान परिषदेच्या २५ जागांपैकी २० जागा भाजप लढवत आहे. त्यापैकी १५हुन अधिक जागा जिंकून पक्ष विधान परिषदेत बहुमत प्राप्त करेल. स्थानिक स्वराज संस्थांचे सदस्य मतदार भाजपलाच मतदान करून विकासाची साथ देतील असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी, राज्यात अवकाळी पावसामुळे लोक संकटात सापडले असताना भाजप मात्र जनस्वराज यात्रा काढत सुरु आहे, ही जनस्वराज यात्रा नसून जनबर्बाद यात्रा असल्याची टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना, सिद्दरामय्या यांची काय पात्रता आहे? त्यांना अजून विधान परिषदेचे उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. अवकाळीने नुकसान झाले हे खरे आहे. पण नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे काम सरकारने सुरु केले आहे. काँग्रेसला लोकांचा पाठिंबा नाही. त्यामुळेच सिद्दरामय्या अशी टीका करत आहेत. निवडणुकीचे निकाल येऊद्यात, मी त्यांना विचारेन, तुमचे उमेदवार का उभे केले नाहीत? असे येडियुरप्पा यांनी सांगितले.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी जनस्वराज यात्रेच्या माध्यमातून कंबर कसली आहे, तर दुसरीकडे भाजपला चीत करायचा विडा काँग्रेसने उचलला आहे. या सगळ्या खेळात मतदार कोणाला विजयी करणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

 

 

Tags: