चिक्कोडी तालुक्यातील अंकली–बावनसौंदत्ती दरम्यानचा ४०० मीटर अंतराचा रस्ता पूर्णतः खराब होऊन अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने लोकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

रायबाग तालुक्यातील यड्राव, चिंचली, नंदीकुर्ली, शिवशक्ती साखर कारखान्याला शेकडो वाहने दररोज अंकली-बावनसौंदत्ती रस्त्यावरूनच जातात. मात्र हा रस्ता संपूर्णपणे नादुरुस्त झाला असून मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहतुकीस अयोग्य बनला आहे. सध्या सळर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाल्येने येथून उसवाहू ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे.
वाहन चालकांना जीव धोक्यात घालूनच येथून वाहने हाकावी लागत आहेत. उसवाहू ट्रॅक्टर्सच्या ट्रॉली उलटण्याची भीती असल्याने सावकाश ट्रॅक्टर्स चालवावे लागतात. यावेळी त्यांच्या मागे दुचाकी व अन्य वाहनांची भलीमोठी रांग लागते. अनेक दुचाकीचालकांचे येथे अपघात होऊन ते जायबंदी झाले आहेत. एवढे असूनही संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
एकंदर अंकली-बावनसौंदत्ती दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने संभाव्य मोठा अनर्थ घडण्याची वाट न पाहता तातडीने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.


Recent Comments