विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजापूर–बागलकोट जुळ्या जिल्ह्यांत राजकीय घडामोडीत वेग आला आहे. काँग्रेसच्या गोटातून विध्यमान विधान परिषद सदस्य सुनीलगौड पाटील यांनाच उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे.

विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी सुनीलगौड पाटील सध्या आपल्या समर्थकांसह राजधानी बंगळुरात तळ ठोकून आहेत. विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. बंगळुरात शुक्रवारी काँग्रेस भवनात झालेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमासही त्यांनी उपस्थिती लावली.
यावेळी विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या आणि काँग्रेस नेतेही उपस्थित होते. यावेळी सुनीलगौडा, वेळ साधून सिद्दरामय्यांशी चर्चा करताना दिसून आले. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी अटकळ बांधण्यात येत आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप काही उघड केलेले नाही. १-२ दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.


Recent Comments