hubali

क्षुल्लक कारणावरून देवस्थानच्या पुजाऱ्यांना मारहाण

Share

क्षुल्लक कारणावरून देवस्थानाच्या पुजाऱ्यांना मारहाण करण्यात आली असल्याची घटना हुबळीमध्ये घडली आहे. शहरातील गोक मार्गावरील ग्रीन गार्डन कॉलनीमधील श्री करियम्मा देवस्थानाचे पुजारी मंजुनाथ हेब्बार यांच्यावर संदीप जडी आणि रेश्मा जडी यांनी हल्ला केला आहे.

१ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या समोर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान देवस्थान समोर असलेल्या गार्डनमधील दुर्वा तुडवू नका असे देवस्थानच्या पुजाऱ्यांनी सांगितले. गार्डनमधील दुर्वा देवाला वाहण्यात येतात असे सांगायला गेलेल्या पुजाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. राज्योत्सव झाल्यानंतर दुसरे दिवशी जडी कुटुंब पुन्हा देवस्थानात आले. आणि पुजाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादावादीदरम्यान पुजाऱ्यांवर जीव घेणं हल्ला करण्यात आला. यासंदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक नगरसेवक सरस्वती दूंगडी आणि त्यांचे पती विनायक दूंगडी यांनी पोलिसांच्या मध्यस्थीने समजून काढली. या घटनेनंतर पुजारी देवस्थानात आले नाहीत. देवस्थान कमिटीतर्फे पुजाऱ्यांना प्रतिमहिना ६ हजार रुपये देण्यात येतात. या मानधनावर पुजारी मंजुनाथ आपल्या आई समवेत जीवन जगतात. या देवस्थानात येणाऱ्या भक्तांकडून पुजाऱ्यांना पुन्हा मंदिरात येण्यासाठी सांगण्यात येत आहे. परंतु घडल्या प्रकारानंतर पुजारी पुन्हा देवस्थानात सेवा बजावतील कि हा वाद पुन्हा डोके वर काढेल, हे पाहावे लागेल.

Tags: