Belagavi

राष्ट्रीय कायदा साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन

Share

न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून आपला वेळ, पैसे आणि आपले अमूल्य जीवन व्यर्थ होण्यापासून वाचवावे, असे आवाहन बेळगावचे वरिष्ठ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वेंकटेश यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या राष्ट्रीय कायदा साक्षरता अभियान आणि स्वच्छता जागृती अभियानांतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, वकील संघ, जिल्हा प्रशासन, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कायदा साक्षरता अभियान आणि स्वच्छता जागृती अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम बेळगावच्या बसवराज कट्टीमनी सभागृहात आयोजिण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना वरिष्ठ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वेंकटेश म्हणाले, लोकप्रबोधनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाखांहून कमी आहे अशा प्रत्येकासाठी मोफत कायद्यासंदर्भात जागृती आणि सेवा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एस सी एस टी समाजासाठी तसेच महिला आणि मुलांसाठी मोफत जागृती करण्याचे कार्य होत आहे.

ते पुढे म्हणाले कि, पोटासाठी चोरी करणे हा कायद्याच्या दृष्टीने अपराध आहे. परंतु मानवतेच्या दृष्टीने हा अपराध नाही. जुन्या संस्कृतीत वाढलेल्या आपल्या लोकांना मूलभूत कायदे माहित आहेत. परंतु लोकांना माहित नसलेल्या कायद्यांची माहिती व्हावी यासाठी आम्ही असे कार्यक्रम आयोजित करत आहोत. असे ते म्हणाले. या कार्यक्रमात अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश परशुराम दोडमनी, प्रादेशिक पर्यावरण अधिकारी जगदीश आय. एच., पर्यावरण अधिकारी प्रियांका विनायक, पालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, न्यायाधीश कृष्ण मल्लापूर, रमेश पट्टणशेट्टी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: