Belagavi

केएलईच्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष; २७९ शिक्षणसंस्था हे अभिमानास्पद : प्रभाकर कोरे  

Share

 १०६ वर्षांपूर्वी लावलेल्या केएलई सोसायटीच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. महाराष्ट्र, राजधानी दिल्ली, बेंगळुरसह देशभरात आज केएलई सोसायटीच्या २७९ शिक्षणसंस्था कार्यरत आहेत हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे अशा शब्दांत संस्थेचे कार्याध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी हर्ष व्यक्त केला.

होय, उत्तर कर्नाटकातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला आज १०६ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे संस्थेच्या जेएनएमसी डॉ. जिरगे सभागृहात शनिवारी केएलईचा स्थापना दिन थाटात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यानंतर बोलताना प्रभाकर कोरे म्हणाले, सप्तर्षींनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या प्रगतीत दानशूरांचे योगदानही मोठे आहे. सध्या संस्थेच्या विविध शाखांत १ लाख ३९ हजार विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच आरोग्यही महत्वाचे आहे. आरोग्य चांगले नसेल तर काहीच करता येत नाही. त्यामुळे १९८६-८७ मध्ये केएलईचे पहिले इस्पितळ बेळगावात सुरु करण्यात आले. आज ४३०० खाटांचे इस्पितळ १३ केंद्रांच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे असे सांगत त्यांनी संस्थेची वाटचाल स्पष्ट केली.

यावेळी केएलईचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, काहेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, सचिव बी. बी. देसाई, डॉ. सुनील जलालपुरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Tags: