शेतकऱ्यांवर दबाव टाकून कंत्राटदाराने हलगा–मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरु केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज मच्छेजवळ जोरदार निदर्शने केली. संघटित विरोध करून जेसीबीसह आलेल्या कंत्राटदाराला परत धाडले.

होय, मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनीचे संपादन होणार असल्याने हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांचा आधीपासूनच विरोध आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन कामाला स्थगिती मिळवली आहे. तरीही रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने जेसीबी घेऊन कार्यस्थळी येत रस्त्याचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी धाव घेऊन रस्त्यावर लाकडे पेटवून देत जोरदार निदर्शने केली. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांवर दबाव टाकून कंत्राटदार रस्त्याचे काम करण्यास पुढे सरसावल्याचा आरोप निदर्शक शेतकऱ्यांनी केला. यावेळी सरकार आणि कंत्राटदाराच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. 
या संदर्भात बोलताना शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले, शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन कामाला स्थगिती मिळवली आहे. तरीही रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने जेसीबी घेऊन कार्यस्थळी येत रस्त्याचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्याने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोर्टाचा अवमान केला आहे. आम्ही हात जोडून सांगतो की, या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांवर अन्याय करू नका. अन्यथा शेतकरी उग्र आंदोलन छेडतील असा इशारा दिला.
शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी, कंत्राटदार बेकायदा काम करत असल्याचा आरोप करून सांगितले की, आधी झिरो पॉईंट निश्चित करून मगच कामाला सुरवात केली पाहिजे. परंतु कोर्टाने स्थगिती देऊनसुद्धा कंत्राटदाराने कोर्ट आदेशाचे उल्लंघन करून काम सुरु करण्याचा प्रयत्न करून गुंडगिरीची वर्तन केले आहे. आता काही दिवसातच विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. सरकारने सर्व काही समजून घेऊन काम केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला.
एकंदर, शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही कधी सरकारी अधिकारी तर कधी कंत्राटदाराकडून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतोय. आता सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.


Recent Comments