लोकप्रिय कन्नड अभिनेता पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाला आज १२ दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त बेंगळुरातील राजवाडा मैदानावर त्रिपुरवासिनी भागात हजारो चाहत्यांना अन्नदान करण्यात आले.

अप्पू, पॉवर स्टार या नावांनी ओळखले जाणारे लोकप्रिय कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे निधन होऊन आज १२ दिवस पूर्ण झाले. काल ११ दिवस पूर्ण झाल्यानिमित्त कुटुंबीयांनी कंठीरव स्टुडिओतील पुनीत यांच्या समाधीस्थळी पूजाविधी करण्यात आले होते. आज १२ दिवस झाल्यानिमित्त चाहत्यांना अन्नदान करण्यात आले. पॅलेस मैदानातील त्रिपुरवासिनी भागात हजारो चाहत्यांना अन्नदान करण्यात आले. पुनीत यांची पत्नी अश्विनी आणि बंधू शिवराजकुमार यांनी अश्रू सावरत अन्नदान मोहिमेला चालना दिली. सकाळी ११ वाजता अन्नदानाला प्रारंभ झाला. एकाचवेळी ५ हजार लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. ४ हजार मांसाहारी आणि एक हजार शाकाहारी कॉउंटर्स ठेवण्यात आले होते. २ गेटमधून ५ हजार खुर्च्या आणि टेबल लावण्यात आले होते. लोकांनी रांगेत थांबून शिस्तबद्धरीत्या भोजन घेतले.
यावेळी पत्रकारांसोबत बोलताना पुनीत यांचे बंधू अभिनेता शिवराजकुमार यांनी सांगितले की, चाहत्यांना जेवू घालण्याची भाऊ पुनीतची खूप मोठी इच्छा होती. मात्र त्याची ही इच्छा अशाप्रकारे पूर्ण होईल असे आम्हाला वाटले नव्हते. चाहत्यांव्यतिरिक्त आमचे काहीच नाही. त्यांच्यामुळेच तर आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळू नये असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. पुनीत यांनीही हेच धोरण ठेवले होते. येथून कोणालाही निराश परत पाठवले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते व पुनीत यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments