Belagavi

बेळगाव सुवर्णविधानसौधमध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी

Share

बेळगाव सुवर्णसौधमध्ये होणारे हिवाळी अधिवेशनाच्या सोयीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. डिसेंबर महिन्यात अधिवेशन होणार हे नक्की असून अधिवेशनाची तारीख मात्र सरकार ठरवेल, अशी माहिती विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली.

: गेल्या दोन वर्षांपासून कोविड पार्श्वभूमीवर बेळगाव विधानसौधमध्ये अधिवेशन भरविण्यात आले नाही. मात्र यंदा अधिवेशन भरविण्यात यावे, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. याचा विचार करून सरकारने बेळगावमधील सुवर्णविधानसौधमध्ये अधिवेशन भरविण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर सभापती बसवराज होरट्टी यांनी सोमवारी सुवर्णसौधला भेट देऊन अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसमवेत चर्चाही केली.

यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बसवराज होरट्टी यांनी विधिमंडळ अधिवेशनासंदर्भात माहिती दिली. २०१८ नंतर बेळगावमध्ये अधिवेशन भरविण्यात आले नसून यंदा बेळगावमध्ये अधिवेशन भरविण्यासंदर्भात पूर्वतयारी बैठक घेण्यात आली आहे. इ-गव्हर्नन्स, सार्वजनिक बांधकाम विभाग, माहिती विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सदर बैठकीत चर्चा करण्यात आली असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सर्व तयारी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले.

यानंतर आमदार भवनाच्या निर्मितीसाठी होत असलेल्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. संबंधितांशी साधक-बाधक चर्चा करून सरकार योग्य निर्णय घेईल. विधानसौधमध्ये दरवर्षी अधिवेशन भरविण्यासाठी आमदार भवनची निर्मिती होणे आवश्यक आहे. अधिवेशन भरविण्यासंदर्भात पाहणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. आमदारांची उपस्थितीत अनिवार्य असण्याची कोणतीही तरतूद नसून मात्र बेळगावच्या अधिवेशनात आमदारांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रश्नोत्तर, शून्य वेळ, तसेच नियमानुसार येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येईल. यावेळच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, विधानपरिषद सचिव महालक्ष्मी, जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते संजीवकुमार हुलकाई, एन. आय. सी. अधिकारी संजीवकुमार क्षीरसागर, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: