जीवाची पर्वा न करता बस पकडण्यासाठी विध्यार्थी–विद्यार्थिनी बेफामपणे बसच्या मागे धावत, लोम्बकळत प्रवास करत असल्याच्या घटना बेळगावातील चन्नम्मा चौकात नित्याच्या झाल्या आहेत.

होय, तुम्ही पाहताय हे दृश्य आहे बेळगावच्या चन्नम्मा चौकातील. आंबेडकर उद्यानासमोरील या बस थांब्यांवर कडोली, कट्टणभावी, मन्नीकेरी, राजगोळी, केदनूर, काकती, हँग आदी गावांना जाणाऱ्या बस थांबतात. मात्र बस येताच तिच्या पाठोपाठ विध्यार्थी-विद्यार्थिनी जीवाची पर्वा न करता सीट पकडण्यासाठी बेफाम धावतात. त्यांची ही धावाधाव एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारीच आहे.
बीम्स जिल्हा इस्पितळासमोरील हा रस्ता नेहमी वर्दळीचा आहे. अंगावर येणाऱ्या वाहनांचा धोका पत्करत विध्यार्थी त्यावरून बस, सीट पकडण्यासाठी धावतात. घरी जाण्याच्या नादात जीव धोक्यात घालून विध्यार्थी हे भलते साहस करतात. बसला लोम्बकळत किंवा पायऱ्यांवर दाटीवाटीने उभे राहत प्रवास करतात. तशातच थांब्यावर प्रवासी जास्त संख्येने असल्याचे दिसले की बसचालकही बसथांब्याच्याही पुढे जाऊन बस थांबवतात. त्यामुळे तसेच बसच्या अपुऱ्या संख्येमुळे हि समस्या उदभवत आहे.
एकंदर, अशी धोकादायक धावाधाव केल्याने एखादा अपघात घडून विध्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते. तसे झाल्यास त्याला कोण जबाबदार? अशी धावाधाव करण्यापेक्षा विध्यार्थी वर्गाने परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून समर्पक बससेवा देण्याची मागणी करणे गरजेचे आहे.


Recent Comments