Belagavi

आधुनिक सत्यवानाची आधुनिक कहाणी! पत्नीच्या स्मरणार्थ चक्क बसवली मूर्ती..!

Share

आपल्या प्रेयसी किंवा प्रियकराच्या प्रेमासाठी अनेक अजरामर इतिहास घडविलेल्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. परंतु आधुनिक युगात प्रेमाच्या परिभाषेत आधुनिक सत्यवानाने एक नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. बेळगावमधील गॅंगवाडी येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या निधनानंतर तिच्या प्रेमाच्या आठवणीत चक्क तिची हुबेहूब मूर्ती बनवून आपल्या घरी बसविली आहे. या आधुनिक सत्यवानाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात या पुढील रोपोर्टमधून…

कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावले. अचानक आलेल्या या अघटित प्रसंगामुळे अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एव्हाना या धक्क्यातून आजही कित्येकजण सावरले नाहीत. परंतु बेळगावमधील गॅंगवाडी येथील शिवा चौगुले या व्यक्तीने कोविडमुळे निधन झालेल्या पत्नीच्या स्मरणार्थ चक्क मूर्तीची स्थापना केली आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ढोलताशाच्या गजरात, मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्या पत्नीची मूर्ती आपल्या घरात शिवा चौगुले यांनी बसविली आहे. बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवा चौगुले यांच्या पत्नी मैनाबाई चौगुले यांचे गेल्या पाच महिन्यापूर्वी कोविडमुळे निधन झाले. आपल्या पत्नीवर अपार प्रेम असणाऱ्या शिवा चौगुले यांनी आपल्या पत्नीची हुबेहूब मूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला.

लाखो रुपयांच्या खर्चातून शिवा चौगुले यांनी आपल्या पत्नीची सिलिकॉन पासून मूर्ती बनविली असून पत्नीच्या स्मरणार्थ रोज तिच्या पुतळ्याची पूजा करण्याचा निर्णय या शिवा चौगुले नामक आधुनिक सत्यवानाने घेतला आहे. एकविसाव्या शतकातील सत्यवान-सावित्रीच्या आधुनिक कहाणीचा भाग असलेल्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी असंख्य लोक शिवा चौगुले यांच्या निवासस्थानी येत आहेत. आणि एकंदर परिस्थिती पाहून या आधुनिक आणि अनोख्या प्रेमकहाणीवर नागरिकदेखील फिदा झाले आहेत.

Tags: