केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करून आरक्षण संपविण्याचा डाव भाजप सरकार खेळत आहे. भाजपमधील दलित नेतेही यावर मौन धारण करून आहेत. यावरून ते भाजपमध्ये का गेलेत हे सिद्ध होते अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते महावीर मोहिते यांनी केली.

चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महावीर मोहिते म्हणाले, घटना बदलण्याची भाषा भाजप नेत्यांनी जाहीरपणे केली. त्यावर भाजपमधील दलित नेत्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? पोटनिवडणुकीवेळी सिद्दरामय्या यांनी भाजपमधील दलित नेत्यांवर केलेली टीका योग्यच आहे. रमेश जिगजीनगी, गोविंद कारजोळ, आनेकल नारायणस्वामी या दलित नेत्यांना भाजपने आपल्या स्वार्थासाठी पाळले आहे. देशात दलितांना मंदिरात प्रवेश नाकारणे, दलित अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले तेंव्हा भाजप नेत्यांनी आवाज का उठवला नाही असा प्रश्न मोहिते यांनी केला.
माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी, आम्ही सत्तेवर आलोय ते घटना बदलण्यासाठी असे जाहीर विधान केले होते. भाजपच्या गो. मधुसूदन यांनी १९५६मध्येच घटनेचा अवमान केला होता. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश रामा जॉईस यांनी १९९९मध्ये आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात गेले होते तेंव्हा देशातील करोडो दलितांवर अन्याय होत असताना भाजपमधील दलित नेते मूग गिळून का गप्प बसले होते? सिद्दरामय्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर दलितांसाठी अनेक कल्याणकारी योजना जारी केल्या. आंबेडकर विकास निगमकडून कर्ज घेतलेल्या अनेकांचे कर्ज त्यांनी माफ केले असे मोहिते यांनी सांगितले
या पत्रकार परिषदेला चिक्कोडी जिल्हा काँग्रेस एससी-एसटी अध्यक्ष नामदेव कांबळे, आनंद अरबळ्ळी, किरण कांबळे, राघवेंद्र कांबळे, दिलीप पायण्णावर, राघवेंद्र मांग आदी उपस्थित होते.


Recent Comments