Belagavi

सायबर फसवणुकीसंदर्भात जागरूक राहणे हा एकमेव मार्ग : डीसीपी विक्रम आमटे

Share

सायबर फसवणूक रोखायची असल्यास प्रत्येकाने जागरूक राहणे हा एकमेव मार्ग असून यासंदर्भात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे. कोणाचीही सायबरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ संबंधित बँक आणि सीईएन पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.

शनिवारी आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव शहरातील सीईएन पोलीस स्थानकाच्या वतीने राष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसंदर्भात प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था यांच्या मध्यमरून जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे. गेल्या एक वर्षात बेळगाव सीईएन पोलीस स्थानकात १३०६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी संबंधित १८५० खाती तातडीने बंद करण्यात आली असून एकूण २ कोटी ३३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी २ कोटी ३३ लाख रुपये परत मिळविण्यात यश आले आहे, असे डीसीपी विक्रम आमटे यांनी सांगितले.

ऑनलाईन, सायबरच्या माध्यमातून ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे, त्यांना तातडीने त्यांची रक्कम परत मिळविण्याच्या हेतूने सायबर विभागात सेवा सुरु करण्यात आली असून कोणाचीही सायबरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ संबंधित बँक आणि सीईएन पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिल्यास पैसे परत मिळणे शक्य आहे. अन्यथा काही प्रकरणांमध्ये आरोपींना शोधण्यात अपयश येईल. यासंदर्भात सध्या जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती डीसीपी विक्रम आमटे यांनी दिली.

बीएसएनएल मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सीईएन सीपीआय बी.आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली एक टीम झारखंड मधील जंतर येथे पाठवली आहे. तिथून एका आरोपीला आणि नाशिकच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे सहा लाख रुपये परत मिळविण्यात यश आले असून अद्याप चार लाख रुपये परत मिळवायचे आहेत, असे ते म्हणाले.

सध्या सर्वत्र ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सर्व व्यवहार होत आहेत. प्रत्येक व्यावसायिक ऑनलाईन पेमेंट स्वीकारत असून नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीसंदर्भातील सुरक्षितता आणि त्यासंदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊन जागरूक राहणे, महत्वाचे आहे.

Tags: