Belagavi

युवक आत्महत्या प्रकरणाचा वैज्ञानिकदृष्ट्या तपास : डीसीपी डॉ. विक्रम आमटे 

Share

बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावातील युवकाच्या आत्महत्यांचे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून, या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून तपास करण्यात येत असल्याचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले.  

होय, नुकतेच २२ ऑक्टोबरला बेनकनहळ्ळी गावातील मारुती गल्लीचा रहिवासी असलेल्या २९ वर्षीय संजय भरमा पाटील या युवकाने गावाजवळील हिरोजी मळ्यातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. संजयचे गावातीलच एका युवतीवर प्रेम होते. युवतीच्या घरच्यांना ते पसंत नव्हते. त्यामुळे त्यांनी संजयला मारहाण केली होती. त्याच्या आत्महत्येला युवतीचे कुटुंबीयच कारणीभूत असल्याचा आरोप करून संजयच्या कुटुंबीयांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

या संदर्भात शनिवारी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन बोलताना डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले, २३ ऑक्टोबरला ग्रामीण पोलिसात मारुती भरमा पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून भादंस कलम १४३, १४७, १४८, ४५२, ३२३, ३०६, ५०४, ५०६ सहकलम ३४ गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. प्रकरणाच्या तपासासाठी सीपीआय सुनील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केले आहे. या प्रकरणाचा वैज्ञानिकदृष्ट्या तपास करण्यात येत आहे. न्यायवैधक प्रयोगशाळेच्या तज्ञांकरवी मृतदेहाची उत्तरीय तपासणी याआधीच करण्यात आली आहे. या प्रकरणी ४ आरोपीना अटक करून न्यायालयाच्या आदेशावरून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे असेही डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले.

संजयला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बेनकनहळ्ळी गावातील पंचमंडळी, संजयचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच आंदोलन केले होते.

 

Tags: