संपूर्ण देशभर धुमधडाक्यात दिवाळी साजरी होत असताना ज्यावेळी दीपोत्सव साजरा करायचा अशावेळी कर्नाटकातील एका भागात भूकंपाचे धक्के जाणवेल असून अचानकपणे भूकंप जाणवल्याने या भागातील जनता भयभीत झाली आहे.. हा कोणता परिसर आहे? नेमकी काय आहे हि घटना? पाहुयात या पुढील रिपोर्टमधून….

देशभरात सुरू असलेली दिवाळीची धामधूम… चारी बाजूंनी उजळून निघत असलेले आकाश… प्रत्येकाच्या घरोघरी दिव्यांची आरास.. आकर्षक सजावट आणि अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून साजरी होत असलेली दिवाळी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात मात्र भीतीदायक ठरली आहे.
विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कळ्ळकवटगी, घोणसगी, सोमदेवरहट्टी, मलकनदेवरहट्टी, हुबनूर, टक्कळकी गावातील जनतेला ऐन दिवाळीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुरुवातीला जमिनीखालून काहीतरी आवाज आल्याचे जाणवले आणि त्यानंतर भूकंपाचे धक्के जाणवले, असे येथील नागरिकांनी सांगितले असून ऐन दिवाळीत अशा पद्धतीने आलेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
विजापूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या भूकंपामुळे भूकंपन मापन यंत्र बसविले आहे. हैद्राबाद येथील भूवैज्ञानिक आणि तज्ज्ञांच्या विशेष पथकाच्या सहकार्याने जिल्ह्यात सदर यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्राच्या साहाय्याने भूकंपाच्या अतिसंवेदनशील डेटासह प्रत्येक तपशीलाची नोंद करण्यात येत असून सदर यंत्रावर हैद्राबादमधूनच नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यामुळे असा कोणताही भूकंप झाल्यास किंवा जाणवल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हा कार्यालयाकडे पाठवली जाते. सदर यंत्र बसवल्यानंतर महिनाभरात भूकंपाची अचूक माहिती उपलब्ध होईल. या यंत्रावर अभ्यास आणि संशोधन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने भूकंपाची भीती बाळगण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
वारंवार विजापूर जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही डोकेदुखी ठरत आहे. या भूकंपाची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध पथकांच्या साहाय्याने अभ्यास आणि संशोधन देखील सुरु केले असून ऐन दिवाळीत झालेल्या या गोंधळामुळे नागरिक मात्र भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर.


Recent Comments