Belagavi

मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले कपिलेश्वर मंदिरात सवत्स गोपूजन !

Share

धर्मादाय, वक्फ आणि हज खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी बलिप्रतिपदेनिमित्त बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात सवत्स गोपूजन केले.

होय, राज्य सरकारच्या निर्णयानुसार, मंत्री शशिकला जोल्ले यांनी दक्षिण काशी तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात बलिप्रतिपदेनिमित्त गाय आणि वासराचे पूजन केले. यावेळी त्यांनी गाय-वासराचे औक्षण करून पंचपक्वान्नांचा नेवैध्य अर्पण केला. यावेळी बेळगावच्या खा. मंगल अंगडी, चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले, आ. अभय पाटील, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर आदी उपस्थित होते.

यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, केवळ बलिप्रतिपदेनिमित्तच गोपूजन करून चालणार नाही. गे आणि तिचे महत्व याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकार पातळीवर गोपूजनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. खेड्यांत ग्राम पंचायत पातळीवर गोपूजन करण्यात येत आहे. राज्यातील ‘ए’ व ‘बी’ श्रेणीच्या मंदिरात गोशाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. देवस्थानांत जागेची कमतरता नाही. सध्या गोशाळांसाठी अनुदान राखीव ठेवलेले नाही. यासंदर्भांत मुख्यमंत्र्यांशी, तज्ज्ञांशी चर्चा करून, सर्वेक्षण करून अनुदान राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

एकंदर बलिप्रतिपदेनिमित्त गोपूजन करून गायीचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या सरकारच्या या उपक्रमाचे जनतेतून स्वागत होत आहे.

 

 

 

Tags: