भाषावाद, जाती-धर्माचे वाद यापलीकडे सौहार्दपूर्ण आणि बंधुभावाचा आदर्श घालून देत निपाणी येथील मुस्लिम समाजातील मुलांनी एक नवा आदर्श घडविला आहे.

सध्या दिवाळीच्या निमित्ताने बालचमू शिवकालीन गड-किल्ल्यांची प्रतिकृती निर्माण करतात. देशात अनेक भाषा, जाती धर्माचे लोक राहतात. परंतु याप्रमाणेच या लोकांमध्ये अनेक वाद देखील घडत असतात. निपाणी येथील तहसीलदार प्लॉट परिसरात मुस्लिम समाजातील मुलांनी या सर्वांपलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांच्या किल्ले पुरंदरगडाची प्रतिकृती साकारून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. इतकेच नाही तर भाषावाद, धर्म आणि जातीवादावरून राजकारण करणाऱ्यांनाही एक शिकवण दिली आहे.
निपाणी येथील तहसीलदार प्लॉटच्या समोरच्या गल्लीत असणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलांनी किल्ले पुरंदरगडाची प्रतिकृती अप्रतिमरीत्या साकारली आहे. यासंदर्भात निपाणी परिसरासह सर्वत्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. केवळ जाती धर्माचे गाजर पुढे करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कित्येकांकडून केला जातो. मात्र निपाणी येथील मुलांनी आपल्या कार्यातून या साऱ्याला फाटा देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात परिधान बुखारी बोलताना म्हणाले कि आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांसमवेत मिळून राहतो. छत्रपती शिवरायांचे आदर्श आमच्यासाठी तर आदर्शवत आहेतच परंतु पुढील पिढीसाठी देखील त्यांचे आदर्श अजरामर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
किल्ले पुरंदरगडाची प्रतिकृती साकारण्यासाठी अरबाज बुखारी, गौरव कोकाटे, आयान चापूस , साजिद चापूस, मुस्तीक नाईकवाडी, फरान चापूस यांनी परिश्रम घेतले आहेत. मुस्लिम समाजातील मुलांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


Recent Comments