दिवाळी पाडव्यानिमित्त प्रत्येक देवस्थानात गायीचे पूजन करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. या पार्श्वभूमीवर चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथील काडदेवर वीरभद्रेश्वर देवस्थानात श्रीशैल जगद्गुरू स्वामीजींच्या हस्ते गोपूजन करण्यात आले.

रंगरंगोटी केलेली गोशाळा, गायी-वासरांना चारा भरवणारे स्वामीजी आणि मंत्रांचे पठण अशा वातावरणात येडूर गोशाळेत गोपूजा करण्यात आली. येडूर येथील काडदेवर मठ आणि वीरभद्रेश्वर देवस्थानच्या वतीने सुरु केलेल्या गो कैलास नामक गोशाळेत श्री १००८ चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. दिवाळी पाडव्यानिमित्त गोपूजन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वामीजींनी स्वागत केले.
पूर्वीपासूनच परंपरेप्रमाणे दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन करण्यात येते. मात्र गायीच्या पोटात साक्षात लक्ष्मीदेवीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे दिवाळी पाडव्यानिमित्त गोपूजन करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे स्वामीजींनी सांगितले. सरकारने केवळ गोपूजन करून न थांबता गायींचे रक्षणही करावे. सर्वच राज्यात गोहत्या बंदी करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी येडूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments