Belagavi

पेट्रोल-डिझेल दरकपातीचे बेळगावकरांकडून स्वागत

Share

केंद्र सरकारने पेट्रोलडिझेलवरील अबकारी शुल्कात कपात केल्यानंतर काही तासातच कर्नाटकात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पेट्रोलडिझेल दरात कपात करत ऐन दिवाळीत जनतेला दिलासा दिला आहे. या निर्णयाचे बेळगावकरांनी स्वागत केले आहे.

होय, गेले अनेक महिने रोजच्या इंधन दरवाढीने जनता मेटाकुटीला आली होती. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात मोठी ओरड सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीशी कपात करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या पाठोपाठ बेळगावात गुरुवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर ७ रुपये २९ पैशानी तर डिझेल प्रतिलिटर १२ रुपये ४८ पैशानी स्वस्त झाले आहे. काल पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११३.६७ पैसे होता तो आज १०७.३८ पैसे झाला आहे.

डिझेलचा दर काल १०४.३० पैसे होता, तो आज ९१.८२ पैसे झाला आहे. यासंदर्भात वाहनचालक वासुदेव शिरोडकर म्हणाले, देशात महागाई वाढली आहे. पूर्वी सोने ३००-४०० रु. तोळा होते. आज ५० हजाराच्या घरात आहे. साखर, किराणा सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलचे दर वाढणे स्वाभाविकच आहे. परंतु लोकांना परवडेल अशी दरवाढ करायला हवी असे त्यांनी सांगितले.

आणखी एका युवकाने सांगितले की, पेट्रोल-डिझेलची दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. पूर्वी १०० रु. च्या पेट्रोलमध्ये दिवसभर फिरून व्हायचे. मात्र आता १०० रुपयातही १ लिटर पेट्रोल येत नाही. दोनदा फेरी मारल्यास १०० रु.चे पेट्रोल संपून जाते. आधी भरमसाठ वाढ करायची आणि नंतर किरकोळ कपात करायची हे धोरण चुकीचे आहे. दरकपातीचे त्यांनी स्वागत केले.

एकंदर दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दरात कपात करून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री बोम्मई यांनी जनतेला थोडाफार दिलासा दिला आहे हे खरे !

 

 

 

Tags: