हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर नगर जवळ असलेल्या आलूर के एम. या गावात पर्यावरणपूरक अशी दिवाळी साजरी करण्यात येत आहे. काय आहे या गावच्या दिवाळीचे स्वरूप? जाणून घेऊयात यापुढील रिपोर्ट मधून…

संपूर्ण देशभरात विविध पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्यात येतो. आकर्षक पणती, रांगोळी, फटाक्यांची आतषबाजी यासह या सणाचा महत्वाचा घटक म्हणजे आकाश कंदील. प्रत्येक घरासमोर आकर्षक असा आकाशकंदील लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर नगर जवळ असलेल्या आलूर के एम. या गावात यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक करण्याची ठरविण्यात आले असून प्रत्येकाने आपल्या घरासमोर कागदापासून तयार करण्यात आलेला आकाशकंदील लावलेला आपल्याला पाहायला मिळेल.
आलूर के. एम. या गावाने यंदाची दिवाळी प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्याचे ठरविले असून स्वच्छ भारत अभियानाला सहकार्य करण्याचा संकल्प आलूर ग्रामस्थांनी केला आहे. संकेश्वर नगरच्या जननी जन्म भूमी सेवा ट्रस्ट आणि सेवाग्राम आलूर यांच्यावतीने या गावातील मुलांना कागदापासून आकाशकंदील बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. मुलांनी या प्रशिक्षणांतर्गत तयार केलेले आकाशकंदील गावातील १५० घरांना मोफत वितरित करण्यात आले आहेत.
जननीजन्म भूमी सेवा ट्रस्टच्या कार्यदर्शी श्रीमती दाणेश्वरी पडेकर यांनी इन न्यूज शी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. दरवर्षी दिवाळी सणात आकाशकंदील हे महत्वाचे वैशिष्ट्य असते. यंदाच्या वर्षी आमच्या ट्रस्टच्यावतीने प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा निर्धार केला असून गावातील सेवा सदस्यांच्या सहकार्याने मुलांनी तयार केलेले आकाशकंदील गावातील सणामध्ये अधिकच खुलून दिसतील, असे त्या म्हणाल्या.
आलूर सेवा संघाचे नेते इराण्णा मगदूम यावेळी बोलताना म्हणाले, गावातील जवळपास १९२ घरांना विविध रंगाचे कागदी आकाशकंदील मोफत वितरित करण्यात आले असून यंदाची दिवाळी प्लास्टिक मुक्त साजरी करण्याचे ठरविले आहे.
या गावातील युवती श्रुती बडिगेर हिरेने सांगितले कि गेल्या सहा दिवसापासून कागदापासून हे आकाशकंदील बनविण्यात येत आहेत. हे कागदी आकाशकंदील प्रत्येक घरासमोर लावून यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करण्यात येणार असल्याचे तिने सांगितले.
सदर आकाशकंदील वितरणावेळी ग्राम पंचायत सदस्या सावाक्का मगदूम, समर्थ कांबळे, प्रतीक्षा चौगुले, शुभम कांबळे, महादेव जाधव, शिवशंकर पाटील, जोतिबा चौगुले आदी उपस्थित होते.


Recent Comments