Kagawad

ऐन दिवाळीत कागवाड नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर संक्रांत

Share

कागवाड ग्रामपंचायतीची सुधारणा होऊन सदर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. याच नगरपंचायतीत कर्मचारी तांत्रिक समस्येमुळे गेल्या पाच महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. नागरपंचायतीतर्फे वेतन देण्यात आले नसून वेतनाशिवाय कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरु ठेवले आहे. सध्या दिवाळी सण अत्यंत जवळ आल्यामुळे हे कर्मचारी देखील आर्थिक अडचणीत अडकले आहेत.

सदर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने ऐन दिवाळीत संक्रांत आली आहे. हि अडचण लक्षात घेऊन कागवाड येथील ‘दादारी फाउंडेशन’ चे अध्यक्ष राजगौड पाटील, ज्योतीकुमार पाटील, काका पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना कपडे आणि सण साजरा करण्यासाठी पैशांची व्यवस्था केली आहे. दादारी फाउंडेशनने घेतलेल्या या पुढाकारामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

याचप्रमाणे स्थानिक कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष सिद्धू पडेयर आणि कार्यकर्त्यांनी देखील पुढाकार घेऊन या कर्मचाऱ्यांना सण साजरा करण्यासाठी पैशांची व्यवस्था करून दिली आहे. या दोन्ही संघटनांनी घेतलेल्या या सहकार्याच्या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात नगर विकास अधिकारी आर. डी. सन्नगौडर, आणि तहसीलदार राजेश बुरली यांच्याशी चर्चा केली असता, कर्मचारी वेतन समस्येसंदर्भात विचार करून त्यांना तांत्रिक अडचणी सोडवून लवकरात लवकर वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, तसेच सण साजरा करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: