Belagavi

सिद्दरामय्या यांच्या निषेधार्थ भाजप एससी मोर्चातर्फे निदर्शने

Share

दलित पोट भरण्यासाठी भाजपमध्ये गेले आहेत असे विधान विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ भाजप एससी मोर्चातर्फे बेळगावात बुधवारी निदर्शने करण्यात आली.

बेळगावातील चन्नम्मा चौकात बुधवारी भाजप एससी मोर्चातर्फे सिद्दरामय्या यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांचा पुतळा जाळून निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सिद्दरामय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  यावेळी बोलताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ. संजय पाटील यांनी, सिद्दरामय्या यांनी ५ वर्षे आपणच मुख्यमंत्री होतो अशा थाटात अहंकारातून हे वक्तव्य केले आहे. ते प्रत्येकाचा अवमान करत आहेत. त्यातूनच त्यांनी दलितांचा अवमान केला आहे. एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असूनही त्यांना असे बोलणे शोभते का असा सवाल त्यांनी केला.

राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यावेळी म्हणाले, सिद्दराम्यांची अवस्था साठीनंतर बुद्धी नाठी अशी झाली आहे. कुठे-कुठे सत्ता गमावू या भीतीने जाती-जातींमध्ये भेदाचे विष कळण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. येडियुरप्पा यांच्या काळात मुस्लिम आमदार नसतानाही एका मुस्लिम नेत्याला मंत्रिपद दिले होते. त्याशिवाय सर्वाधिक दलित आमदार मंत्री बनले ते भाजपच्याच काळात. दलितांना राजकीय नेतृत्व मिळाले ते भाजपमुळेच हे सिद्दरामय्यांनी विसरू नये असे कडाडी यांनी ठणकावून सांगितले.

पोटनिवडणुकीच्या प्रचारात सिद्दरामय्यांनी राष्ट्रपुरुषांना जातीपुरते मर्यादित ठेवले. प्राण्यांनाही जातीपुरते मर्यादित ठेवणारी व्यक्ती म्हणजे सिद्दरामय्या. बकरी मेल्यावर नुकसान भरपाई देणाऱ्या सिद्दरामय्यांनी म्हैस मेल्यावर भरपाई नाकारली होती अशी टीका त्यांनी केली.

या निदर्शनात भाजप जिल्हा व शहर एससी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

 

Tags: