साहित्याच्या सर्व स्तरांवर महिला सक्षमीकरण, जागतिक दर्जाचे महिला साहित्य संमेलनाचे आयोजन, दोन विशेष महिला साहित्यसंमेलनापैकी एक जागतिक स्तरावर महिला संमेलनाचे आयोजन यासह दलित व युवा साहित्य संमेलनाचे आयोजन अशी स्वप्ने आपण पहिली आहेत, अशी प्रतिक्रिया कन्नड साहित्य सभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या डॉ. सरस्वती चिम्मलगी यांनी व्यक्त केली आहे. बुधवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सरस्वती चिम्मलगी बोलत होत्या. डॉ. सरस्वती चिम्मलगी या कन्नड साहित्य सभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत असून या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. उमेदवारांना काहीही देऊन त्यांना आमिष दाखवणे योग्य नाही, साहित्यात राजकारण येऊ नये. काही लोक अशापद्धतीने वर्तन करत असून याचा मी निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ. सरस्वती चिम्मलगी पुढे म्हणाल्या कि, कसापच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या एकूण २१ उमेदवारांपैकी मला वगळता कोणीही योग्य साहित्यिक नाहीत. काही साहित्यिक वगळता कोणीही सर्जनशील साहित्यिक या उमेदवारांमध्ये नाहीत. यंदाच्या निवडणुकीत मला पात्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी साहित्यिक अशोक मळगली, ज्योती बदामी यांच्यासह इतर मान्यवर आणि साहित्यिक उपस्थित होते.


Recent Comments