Belagavi

नीट परीक्षेत आरएलएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

Share

बेळगावमधील केएलई संस्थेच्या आरएलएस महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत संपूर्ण देशात ३८४ रॅंक ने यश मिळविले असून इतर २० विद्यार्थ्यांनीही नीट परीक्षेत यश संपादन केले आहे.

नीट परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून राजा लखमगौडा विज्ञान महाविद्यालयाच्या महम्मद कैफ या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६९१ गुण मिळवत देशात ३८४ वे स्थान प्राप्त केले आहे. देशातील ओबीसी श्रेणीतील ८८ वे स्थान प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. याप्रमाणेच सोहम चिपरे या विद्यार्थ्याने ७२० पैकी ५३२ गुण प्राप्त करून उत्तम श्रेणीत यश मिळविले आहे. मंगळवारी महाविद्यालयात या विद्यार्थ्यांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

यावेळी बोलताना प्राचार्य विश्वनाथ कामगोळ म्हणाले, आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. देशात महाविद्यालयाचे नाव उंचावल्याने ही बाब महाविद्यालयासाठीही अभिमानास्पद आहे. कोविड परिस्थितीमुळे ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिकूनदेखील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले असून भविष्यात देखील त्यांच्या या विद्येचा इतरांना लाभ व्हावा, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी नेट परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलेल्या शिक्षकांचे आणि सर्वांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Tags: