केवळ देवा–धर्माविरोधात बोलतो म्हणून माझ्यावर भरपूर टीका झाली. टीका झाली तरी मी माझा मार्ग सोडला नाही. नवनव्या लोकांना घेऊन नवा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

चिक्कोडीत सोमवारी सायंकाळी मानव बंधुत्व वेदिके आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ‘आमचे पाऊल बुद्धाकडे’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, आपण बदलले पाहिजे, भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालले पाहिजे असे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले आहे.
निजगुणानंद स्वामीजी आणि मी गेली अनेक वर्षे राज्यात अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देत आहोत. आता आम्हाला राजरत्न आंबेडकर यांची साथ मिळाली असल्याने आनंद झाला आहे. भगवान बुद्ध, बसव, आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करून आम्ही समाजामध्ये परिवर्तन आणले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी निपाणीचे माजी आ. काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महावीर चिंगळे, रवी नायकर, जीवन मांजरेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments