Belagavi

तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा; आमचा लढा सुरूच ठेवू ! काळ्या दिनाच्या सभेत इशारा

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात सोमवारी मराठा मंदिर येथे निषेध सभा घेऊन काळा दिन पाळण्यात आला. सीमाभागातील मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा सरकारचा आणि पोलिसांचा प्रयत्न उधळून लावण्यात येईल असा एकमुखी इशारा या सभेत देण्यात आला.

यावेळी सभेला संबोधित करताना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, आजच्या निषेध सभेत कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत आहे. पहाटे ४ वाजल्यापासून घरासमोर पहारा लावण्यात आला. ६४ वर्षांपूर्वी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय झाला. त्याच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी भाषिक आंदोलन करत आहेत.

केंद्र सरकारच्या विरोधात लोकशाहीपूर्ण मार्गाने हे आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही कधीही कर्नाटक किंवा कानडी भाषेच्या विरोधात नव्हतो आणि नाही. बेळगाव पूर्वी मुंबई प्रांतात होते. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी आम्ही आंदोलन केले तर त्यात काय चूक आहे? असा प्रश्न करून तुम्ही कितीही गुन्हे आमच्यावर दाखल करा, आम्ही घाबरणार नाही, आमचे अधिकार मिळवण्यासाठी आमचा लढा सुरूच ठेवू असा खणखणीत इशारा शुभम शेळके यांनी यावेळी दिला.

Tags: