Belagavi

म. ए. समितीची श्वानाशी तुलना; पालकमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य 

Share

 मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सुरु असलेल्या लोकशाहीपुर्ण लढ्याची तुलना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सोमवारी श्वानाशी केल्याने संताप पसरला आहे. हत्ती डौलाने जाताना कुत्रे भुंकल्याने काही होत नाही अशा शब्दांत मंत्री कारजोळ यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची संभावना केली.

बेळगावातील सीपीएड कॉलेज मैदानावर कर्नाटक राज्योत्सवानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ यांनी न्यायासाठी लढणाऱ्या मराठी माणसाचा अवमान केला. पुढील काळात म. ए. समितीला सरकार धडा  शिकवेल अशी वल्गना केली. प्रत्येक ५० किमीवर भाषा बदलते हे लक्षात ठेवून भाषेवरून कोणी आंदोलन करू नये. पाकिस्तान-भारतामधील भांडणांप्रमाणे कर्नाटक-महाराष्ट्रात भांडण होऊ नये. सरकार सर्वांना पेमाने, विश्वासाने सोबत घेऊन जाणार आहे. बेळगाव आता बदलते आहे. मातृभाषा घरात बोला, बाहेर मात्र कन्नडच बोला असा मानभावी सल्लाही मंत्री कारजोळ यांनी दिला.

म. ए. समितीवर सरकार कारवाई का करत नाही या कन्नड पत्रकारांच्या प्रश्नावर, काही उपद्व्यापी लोकांनी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी सीमाप्रश्न जिवंत ठेवला आहे. त्यांना किंमत द्यायची गरज नाही. हत्ती डौलाने जाताना कुत्रे भुंकल्याने काही होत नाही अशा शब्दांत त्यांनी म. ए. समिती आणि मराठी माणसाविषयी संतापजनक उद्गार काढले.

राज्योत्सव पुरस्कार देण्यात बेळगाव जिल्ह्यावर अन्याय झालाय का ? यावर मंत्री कारजोळ यांनी मीसुद्धा पुरस्कारांबाबत समाधानी नाही. जिल्ह्याला किमान ३ तरी पुरस्कार मिळायला हवे होते. पुढील वर्षी सगळे ठीक करू असे मंत्री कारजोळ यांनी सांगितले.

एकीकडे मराठी माणसाविषयी असूया बाळगायची आणि दुसरीकडे त्याला सामावून घ्यायचे नाटक करायचे हा कानडी नेत्यांचा  दुटप्पीपणाच मंत्री कारजोळ यांच्या आजच्या वक्तव्यातून स्पष्ट झाला असेच म्हणावे लागेल.

 

 

Tags: