अखंड कर्नाटक निर्माण करण्यासाठी श्रम घेतलेल्या अनेक आंदोलकांचे स्मरण करत कर्नाटकाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी हातभार लावूया. कन्नड भाषेच्या प्रगतीसाठी पुढाकार घेऊया, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.

बेळगावच्या सीपीएड मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वाटने कन्नड राज्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस विभागासह विविध पथकांच्या वतीने झालेल्या पथसंचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध विभागात उत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. 
या कार्यक्रमात बोलताना जिल्हा पालकमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचा राज्योत्सव साधेपणात आचरणात आणण्यात येत आहे. अखंड कर्नाटकासाठी परिश्रम घेतलेल्या मान्यवरांना आज आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला त्यांनी राज्योत्सव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्योत्सवात पुरस्कारप्राप्त अथणी येथील बी. एल. पाटील यांच्यासह सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले कि, बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार अधिक प्राधान्य देत असून कित्तूर कर्नाटकाच्या विकासासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. कित्तूर उत्सव हा राज्यस्तरावर साजरा करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा पालकमंत्र्यांनी केली. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा आढावा आणि तपशील गोविंद कारजोळ यांनी दिला.
यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जि. पं. सीईओ दर्शन, शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी यांच्यासह विविध अधिकारी, मान्यवर आणि कन्नड भाषिक उपस्थित होते.


Recent Comments