Vijayapura

सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान

Share

 गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरीत अडकलेल्या सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर शनिवारी मतदान पार पडले. नवमतदारांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सिंदगी मतदार संघ राज्यातील बड्या-बड्या नेत्यांच्या प्रचारसभा, फेऱ्या, पत्रकार परिषद, आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाला होता. जिल्हा प्रशासनाने तैनात केलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात शनिवारी पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. एकूण २३४५८४ मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. देवनगावात भाजप उमेदवार रमेश भुसनूर यांच्या भगिनी प्रभावती आणि एका मुस्लिम महिलेने मतदानयंत्राची पूजा केली. याच गावात बूथ क्र. ९ मध्ये रमेश भुसनूर यांनी सपत्नीक मतदान केले. जेडीएसच्या उमेदवार नाजिया अंगडी यांनी मतदानापूर्वी सिंदगी शहरातील गादी हुसेन पाशा दर्ग्याला कुटुंबियांसमवेत भेट देऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी, गणिहार गावातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

काँग्रेस उमेदवार अशोक मनगुळी यांनी आपल्या मलघान या गावातील सरकारी कन्नड शाळेतील बूथ क्र. १०६वर पत्नी नागरत्ना यांच्यासमवेत जाऊन मतदान केले. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पैसे वाटून निवडणूक जिंकू असे भाजप नेत्यांना वाटत असावे, पण सिंदगीतील जनता जागरूक आहे, पैशांसाठी विकली जाणारी नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान नागठाण राखीव मतदारसंघाचे आ. देवानंद चव्हाण यांनी पत्नी सुनीता यांच्यासह तांडा गावातील नारायणहट्टी गावातील बूथ क्र. ९३ वर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.

शनिवारी सकाळी ७ वाजता सुरु झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होती. वयोवृद्धांसह विविध वयोगटातील मतदारांनी उत्साहात मतदान केले. नवमतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला. एकंदर आजच्या मतदानात काँग्रेस-भाजपसह जेडीएस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. ते २ नोव्हेंबरला मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे.

 

Tags: