Belagavi

नव्या बुडा अध्यक्षांनाही टिकू देतात की नाही हे पहावे लागेल : आ. जारकीहोळी

Share

आमदार आणि बुडाचे माजी अध्यक्ष यांच्यातील मतभेद हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माजी अध्यक्षांना पायउतार केल्यावर तरी ते समाधानी आहेत किंवा नाही हे त्यांनीच सांगावे अशी खिल्ली केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी उडविली.

शुक्रवारी बेळगाव महानगरपालिका आणि बेळगाव नगरविकास प्राधिकरणाला आ. सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांची सभा घेतली. यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून विकासकामांसंदर्भात माहिती घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. जारकीहोळी म्हणाले, आता नव्या अध्यक्षांनाही टिकू दिले जाते की नाही हे पहावे लागेल असे सांगत आ. अभय पाटील व आ. अनिल बेनके यांना त्यांचे नाव न घेता टोला लगावला. विकासासाठी आमचे सहकार्य नेहमीच असेल असेही त्यांनी सांगितले.

काही योजनांबाबत आज नगरविकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत सभा घेतली आहे. गेल्यावेळी काही माहिती आम्ही मागितली होती. ती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्मार्टसिटीतील सुमार दर्जाची कामे, अतिवृष्टीने घरे गमावलेल्याना घरे बांधून देणे, अनधिकृत लेआऊटमध्ये घरांचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे असे आ. जारकीहोळी म्हणाले.

यावेळी बुडा अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: