माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी अल्पसंख्यांकांची टोपी घालून घोंगडीचा अवमान केला आहे अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांनी केली आहे.

होय, सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीत ‘घोंगडी’चा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सिद्दरामय्या यांच्यावर टीका करताना, ‘घोंगडी पांघरण्यासाठीही पात्रता असावी लागते’ अशी बोचरी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सिद्दरामय्या यांचे नाव न घेता केली होती. आता त्यांचे मंत्रीही त्यांचीच री ओढत आहेत. विजापूर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांनी, सिद्दरामय्या यांनी अल्पसंख्यांकांच्या कार्यक्रमात त्यांची टोपी घालून घोंगडीचा अवमान केला आहे अशी टीका केली. ते कितीही बोलले, कितीही टीका केली तरी २ तारखेला सगळे स्पष्ट होणार आहे.
पोटनिवडणुकीच्या प्रचारात सिद्दरामय्या खूप काही बोलले. अगदी वेड्यासारखे बरळले. त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना, ‘कधी घोंगडे विणले आहे का’ असा प्रश्न केला होता. सिद्दरामय्या यांनी स्वतः कधी घोंगडे विणले आहे का’ असा प्रतिप्रश्न मंत्री पाटील यांनी केला. राजकारणात जात कधी आणू नये, त्यांनी ती आणली. ते जे बोलले ते ऐकून दुःख झाले. त्यांना पराजयाची भीती वाटत आहे. आम्ही १५ दिवस जोरदार चुरशीने प्रचार केला आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार केला आहे. सिंदगीत आमचा किमान २५ हजारांच्या मताधिक्क्याने विजय होईल असा दावा मंत्री सी. सी. पाटील यांनी यावेळी केला.
सिंदगी पोटनिवडणुकीत सगळेच नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. या गोंधळात मतदार राजा कोणाला कौल देणार हे पहावे लागेल.


Recent Comments