विजापूर जिल्ह्यातील सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरला आहे. बुधवारी जाहीर प्रचाराची मुदत संपताच पडद्याआडूनच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या ७–८ दिवसांत आरोप–प्रत्यारोपांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

जेडीएसचे आ. एम. सी. मनगुळी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सिंदगी मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यात काँग्रेसतर्फे मनगुळी यांचे पुत्र अशोक मनगुळी, भाजपतर्फे २ वेळा आमदार राहिलेले रमेश भुसनूर तर जेडीएसतर्फे नाजिया शकील अंगडी निवडणूक लढवीत आहे. मात्र खरा सामना काँग्रेसचे अशोक मनगुळी आणि भाजपचे रमेश भुसनूर यांच्यातच होत आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सिंदगी गाठत प्रचार सुरु केला.
प्रामुख्याने भाजप व काँग्रेसमध्ये लढत असल्याचे दिसून येत आहे. प्रचारात दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांनी भाग घेतला. मात्र विकासाच्या मुद्यांऐवजी वैयक्तिक पातळीवर टीका-टिपणी होत प्रचाराने खालची पातळी गाठली. भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी पक्षाचे उमेदवार रमेश भुसनूर यांच्या वतीने भव्य प्रचारफेरी काढून जाहीर प्रचार केला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात असताना त्यांनी, सिंदगी आणि हानगल या दोन्ही मतदारसंघात भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे सांगत भाजपच्या विजयाचा दावा केला. मोदींच्या भ्रष्टाचार विरहित प्रशासन, दहशतवादाचा मुकाबला, नक्षली कारवायांना ब्रेक आदी कामगिरीमुळे दोन्ही ठिकाणी भाजपचं विजय पताका फडकावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजप विकासाच्या मुद्यांवर पोटनिवडणूक लढवीत आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आणलेल्या विकासयोजना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येडियुरप्पा यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु ठेवल्या आहेत. त्या कल्याणकारी योजना आज गावोगावी पोहोचल्या आहेत असे सांगतानाच काँग्रेसवरही कटील यांनी प्रचारादरम्यान, काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला. ६० वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने देशाला दहशतवाद, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि गरिबी या ४ देणग्या दिल्या. या काळात देशात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. मग त्यांनी काय विकास केला हे सिद्दरामय्यांनी सांगायला हवे होते. पण त्यांना काँग्रेसच्या पराभवाची भीती वाटते. केवळ जातीयतेच्या समीकरणातून काँग्रेस निवडणूक लढवत आहे असा सनसनाटी आरोपही कटील यांनी या दरम्यान केला आहे. 
दरम्यान, जेडीएसच्या उमेदवार नाजिया अंगडी यांच्या वतीने माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी प्रचार केला. सिंदगी शहरातील विवेकानंद चौकातून बाईक रॅली काढून, उघड्या वाहनातून जेडीएसच्या वतीने देवेगौडा यांनी मतयाचना केली. त्याचवेळी कुमारस्वामी यांनी माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्यावर टीकेची तोफ डागली. पोटनिवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप सिद्दरामय्यांनी जेडीएसवर केला होता. त्याचा समाचार घेताना कुमारस्वामी यांनी हा आरोप सिद्ध करण्याचे आव्हान सिद्दरामय्यांना दिले. मी खोटे बोलतो असे त्यांचे म्हणणे असेल तर ते काय राजा हरिश्चन्द्राचे वंशज लागून गेलेत काय असा सवाल त्यांनी केला. सत्य हरिश्चंद्र या कलियुगातत्यांच्या घरासमोरून गेला होता. आमच्या नव्हे. राज्यात सिद्दरामय्या एकटेच हरिश्चंद्र दुसरे कोणी नाही. आपल्याच काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी त्यांनी पैसे घेतले होते. २००९मध्ये आपल्या मित्राकरवी पैसे घेऊन त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. हे खरे की, खोटे हे सिद्दरामय्यांनीच सांगावे. माता चामुंडेश्वरीच्या आशीर्वादाने विजयी झालात, तिचीच शपथ घेऊन सांगा पैसे घेतले नाहीत म्हणून, असे थेट आव्हान कुमारस्वामींनी सिद्दरामय्यांना प्रचारादरम्यान दिले. बाईट
कुमारस्वामींच्या या आरोपावर प्रतिक्रिया देण्यास नकार देत, कुमारस्वामी हे खोटारडे आहेत, त्यांच्याबद्दल मला काय विचारू नका असे म्हणत कुमारस्वामींची निर्भत्सना केली आहे.
एकंदर परस्पर आरोप-प्रत्यारोपांनी सिंदगी पोटनिवडणुकीच्या रणांगण चांगलेच तापले आहे. जाहीर प्रचाराची मुदत संपल्याने बडे नेते परत जात आहेत. आता घरोघरी प्रत्यक्ष मतदारभेटी आणि गुप्त प्रचाराला वेग आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारराजा कोणाला कौल देतो हे निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे.


Recent Comments