बेनकनहळ्ळीतील युवक संजय भरमा पाटील याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गावातील पंच कमिटी सदस्य, गावकरी आणि नातेवाईकांनी बेळगावात गुरुवारी निदर्शने केली.

होय, २२ ऑक्टोबर रोजी बेनकनहळ्ळी गावचा ३१ वर्षीय युवक संजय भरमा पाटील याने गावाशेजारील हिरोजी मळा येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. परंतु मुलीच्या घरच्यांचा याला विरोध होता. आमच्या मुलीच्या नादाला लागलास तर याद राख अशी तंबी त्यांनी संजयला दिली होती. एवढेच नाही तर त्याच्या आत्महत्यांचे आधल्या दिवशीच मुलीच्या घरच्यांनी त्याच्या घरी येऊन संजयच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्यावर प्राणांतिक हल्ला केल्याचा आरोपही संजयच्या कुटुंबीयांनी केला आहे. हि गोष्ट मनाला लावून घेत संजयने आत्महत्या केली. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपीना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेनकनहळ्ळी गावच्या पंचकमिटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि संजयच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी संजयला न्याय देण्याच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकारांना माहिती देताना संजयच्या नातेवाईक अनिता पाटील म्हणाल्या, आमच्या मुलाला मुलीच्या घरच्यांनी धमकी दिली होती. आत्महत्येच्या आधल्याच दिवशी त्यांनी संजयला घरी येऊन डोळ्यात मिरचीपूड टाकून प्राणांतिक हल्ला केला होता. त्याला घबरून आमच्या मुलाने आत्महत्या केली आहे. आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. देसूरकर कुटुंबीयांनी मिळून संजयला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी अनिता पाटील यांनी केली.
या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी ४ आरोपीना अटक केली आहे. मात्र सर्व आरोपीना अटक करून शिक्षा द्यावी या मागणीसाठी पंच, ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी निदर्शने करून जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. आता आणखी कोणाला अटक होणार याची प्रतीक्षा करावी लागेल.


Recent Comments