हलगा बेळगाव येथील सुवर्णविधानसौधसमोर कन्नड अभिमान्यांकडून आज कन्नड गीत गायन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात कन्नड अभिमानी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समूह गीत गायन केले.

१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कन्नड राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्योत्सवाला अर्थपूर्णरीत्या महत्व देण्यासाठी राज्य सरकार आणि कन्नड संस्कृती आणि विकास प्राधिकरणांतर्गत कन्नड गीत गायन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावमधील हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ आणि जिल्हा पंचायत सीईओ दर्शन यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा – महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रकवी कुवेम्पू यांनी रचलेले राज्यगीत गायिले. यानंतर उपस्थितांनी डॉ. निसार रहमान यांनी रचलेले नादब्रम्ह आणि डॉ. हंसलेख यांनी रचलेले कन्नड गीत गायिले.
यावेळी कर्नाटक राज्याचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने कन्नड भाषेचा अभिमान राखण्याची शपथ घेतली. यासह कर्नाटकात कन्नड व्यतिरिक्त राहणाऱ्या इतर भाषिकांना कन्नड शिकवण्याची आणि राज्याची संस्कृती आणि परंपरा जपण्याची शपथ घेतली.


Recent Comments