Belagavi

परदेशी आकाशकंदीलमुळे पारंपरिक आकाशकंदील व्यवसायाला फटका 

Share

सध्या देशभरात दिवाळीची धामधूम सुरु आहे. दिवाळीत पारंपरिक आकाशकंदील ने घर सजवले जाते. परंतु अलीकडच्या काळात अनेक सजावटीच्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. यातच परदेशातून अशा वस्तू आयात करून स्वस्त दारात उपलब्ध होत आहेत. यामुळे स्थानिक व्यावसायिकांना फटका बसत असून सध्या हे व्यावसायिक अडचणीचा सामना करत आहेत.

सध्या दिवाळीच्या खरेदीचा मोसम जोरदार बहरला आहे. बाजारपेठेत गर्दी देखील दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात नागरिकांनी कोरोनामुळे दिवाळी सण साधेपणात साजरा केला आहे. यंदा बाजारपेठ संपूर्ण सजली असून निरनिराळ्या सजावटीच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. दिवाळी हा सण अर्थातच दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. यामुळे बाजारपेठेत इलेक्ट्रिकल वस्तूंसह आकर्षक स्वरूपातील दिवे, पणत्या दाखल झाल्या आहेत. दिवाळी सणात प्रत्येक घरासमोर आकाश कंदील लावण्याची परंपरा आहे. बाजारपेठेत पारंपरिक आकाशकंदीलसह अनेक नमुन्यांचे आकाशकंदील दाखल झाले आहेत. परंतु या सर्वामुळे पारंपरिक आकाश कंदील व्यवसाय मात्र मंदावला आहे.

बेळगावमधील बुरुड गल्ली येथील बुरुड समाजातील व्यावसायिक हे आकाशकंदील तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपले हस्तकौशल्य वापरून बुरुड गल्लीमध्ये अनेक प्रकारचे आकाशकंदील तयार करण्यात येत आहेत. हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी सुरु आहे. परंतु सध्या बाजारातील अनेक पद्धतीच्या आकाशकंदीलमुळे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या आकाशकंदीलची मागणी घटली  आहे.  आधुनिक जीवनशैलीनुसार नागरिक आता आधुनिक आकाशकंदिलकडे वळत असल्याने सध्या आपला व्यवसाय अडचणीत आल्याची प्रतिक्रिया बुरुड गल्ली येथील मोहन कोरडे यांनी व्यक्त केली आहे.

आधुनिक शैलीनुसार माणूस बदलत असला तरी आपले सण पारंपरिक पद्धतीने साजरे व्हायला हवेत.  प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून आपल्या देशी वस्तूंचा वापर वाढवणे गरजेचे आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने सण साजरे करत असताना पारंपरिक वस्तूंचाच वापर करणे गरजेचे आहे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. माणसाच्या आधुनिक जीवनशैलीमुळे सध्या सुपरफास्ट सुविधांचा प्रत्येकाकडून वापर केला जात आहे. भारताला संस्कृती प्रधान देश असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार  सण साजरे करताना आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या देशाच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार करून पारंपरिक वस्तूंचा वापर करणे हि काळाची गरज आहे.

Tags: