समाजात दुर्लक्षिल्या गेलेल्या विधवा महिलांसाठी बेळगाव जिल्ह्यात सरकारने ८ हजार घरे मंजूर केली आहेत. यावर्षी चिक्कोडी तालुक्यातील ९ ग्रापंना १२० घरे मंजूर झाली आहेत अशी माहिती विधान परिषदेतील सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी दिली.

चिक्कोडीतील सीएलई संस्थेत बेंगळूरच्या राजीव गांधी गृहनिर्माण मंडळातर्फे देवराज अरस विशेष गृहनिर्माण योजनेतून चिक्कोडी-सदलगा मतदार संघातील विविध ग्रापं हद्दीतील निराधार विधवांना घर मंजुरीची हक्कपत्रे समारंभपूर्वक देण्यात आली. त्यावेळी हक्कपत्रांचे वाटप केल्यावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात १० हजार घरेवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सरकारच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. बेळगाव जिल्ह्याला ८ हजार घरे मंजूर करवून घेतली आहेत. समाजाचे ऋण फेडण्यासाठी लोकसेवा करत असून, आगामी दिवसात आणखी सरकारी योजना मंजूर करवून घेणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी चिंचणीचे अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमात तहसीलदार एन. बी. गेज्जी, भरतेश बनवणे, ताप सीईओ वीराण्णा वीरनगौडर, चिक्कोडी नगरपरिषद उपाध्यक्ष संजय कवटगीमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments