शिक्षण मंत्र्यांनी केवळ शाळा प्रारंभ करण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र शाळेपर्यंत विद्यार्थी पोहोचण्यासाठी त्यांना बस सुविधेची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसून विद्यार्थ्यांना तातडीने बस सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह करत बैलहोंगल येथे विद्यार्थी आणि पालकांनी रास्ता रोको केला आहे.

राज्यभरात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा आता भरविण्यात येत असून विद्यार्थ्यांसमोर आता बसची समस्या जाणवत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी बस सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बैलहोंगल येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आहे. सदर परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी ६ किलोमीटर प्रवास करावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात बोलताना एका विद्यार्थ्याने सांगितले कि, बैलहोंगल परिसरात बसवेश्वर कॉलनीपासून बेविनकोप्प पर्यंत ६ किलोमीटरचा प्रवास पायी चालून पार करावा लागला आहे. बस सुविधा उपलब्ध नाही. एका बस साठी विद्यार्थ्यांना ९ तास प्रतीक्षा करावी लागते, असे या विद्यार्थ्याने सांगितले.
वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी के एस आर टी सी विरोधात संताप व्यक्त केलाय. आधीच कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशातच दोन वर्षानंतर आता शाळांना सुरुवात झाली असून बस समस्येमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याची तक्रार पुढे येत आहे. संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनी तातडीने हि समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments