सरकारी कागदपत्रे मराठी भाषेत द्यावीत, इंग्लिश-कन्नडप्रमाणे मराठी भाषेतही नामफलक लावावेत, महापालिकेसमोरील अनधिकृत लाल-पिवळा ध्वज हटवावा, मनपावर भगवा फडकवावा आदी मागण्यांसाठी बेळगावात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या निमित्ताने समितीचा बुलंद आवाज पुन्हा एकदा निनादला.

होय, भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना मराठीतून सरकारी कागदपत्रे द्यावीत, इंग्लिश-कन्नडप्रमाणे मराठी भाषेतही नामफलक लावावेत, महापालिकेसमोरील अनधिकृत लाल-पिवळा ध्वज हटवावा, मनपावर भगवा फडकवावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी मोर्चाचे आयोजन केले होते. बेळगाव शहरासह बेळगाव तालुक्याच्या विविध भागांतून आलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते सकाळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात जमले. तेथून कॉलेज रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन होते. मात्र ‘करनाटकी’ पोलिसांनी चौकात बॅरिकेड्स लावून नेहमीप्रमाणे हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला.
अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी कार्यकर्त्यांसमोर येऊन मोर्चा काढू नका, मला निवेदन द्या, ते सरकारला पाठवतो असे आवाहन केले. मात्र आक्रमक कार्यकर्ते त्याला बधले नाहीत. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कढणारच, जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देऊ असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवल्याने समिती कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठाण मांडले. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणारच असा वज्रनिर्धार त्यांनी केला. कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर पोलीस नमले व त्यांनी बॅरिकेड्स हटवले.
त्यानंतर जोरदार घोषणा देत समिती कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘जोर से बोलो, बेळगाव आमचे’, ‘नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी’, ‘बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘मराठीत कागदपत्रे मिळालीच पाहिजे’ या व अन्य घोषणा समिती कार्यकर्त्यांनी जोशात दिल्या. अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनीही त्वेषाने मराठी बाणा दाखवत मोर्चात सहभाग घेतला.


Recent Comments