Belagavi

सुट्टी संपली, शाळा भरली ! चिमण्या – पाखरांचा किलबिलाट सुरु

Share

 स्वच्छ परिसर, सुबक रांगोळ्या, दाराला तोरणे अशा एखाद्या उत्सवमूर्तीप्रमाणे नटलेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांचा किलबिलाट आज पुन्हा ऐकायलाअनुभवायला मिळाला.

होय, कोरोनाच्या धसक्यामुळे तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर बेळगाव शहर आणि जिल्ह्यात सरकारच्या आदेशावरून आज, सोमवारपासून शाळा पुन्हा भरण्यास प्रारंभ झाला. पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिकच्या वर्गांतील  चिमुकल्यांची पावले शाळेकडे वळली. सजलेल्या शाळांनीही विद्यार्थ्यांचे प्रेमाने, आपुलकीने स्वागत केले. सरकारच्या आदेशानुसार हा एक आठवडा शाळा अर्धवेळ भरणार असून, पुढील आठवड्यापासून पूर्णवेळ शाळा भरविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग, मास्कचा वापर सक्तीचा, कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन आदी नियमांचे पालन करत शाळा भरविण्याचा आदेश शिक्षण खात्याने कोविड तज्ज्ञ समितीच्या मान्यतेनंतर बजावला आहे. सोमवारी आधी घरात आढेवेढे घेणाऱ्या बच्चे कंपनीला पालकांनी प्रेमाने, दटावणीने शाळेत आणून सोडले. त्यानंतर अनेक दिवसांनी भेटलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना पाहून बच्चे कंपनी, जणू ‘तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा’ म्हणत आनंद, हर्ष व्यक्त करत शाळेत रममाण झाली.

अनेक महिन्यांनी येणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये वर्गखोल्यांची साफसफाई करून, रांगोळ्या घालून दाराला तोरण बांधून शाळा सजविण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापक-शिक्षकांनी मोठ्या प्रेमाने विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत केले. आजपासून ३० ऑक्टोबरपर्यंत सकाळी १०.०० ते दुपारी १.३० तर शनिवारी सकाळी ८.०० ते ११.४० या वेळेत अर्धवेळ शाळा भरविण्यात येणार आहेत. त्यानंतर २ नोव्हेंबरपासून सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत पूर्णवेळ शाळा भरविण्यात येणार आहेत. शाळा भरविताना कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. सर्वानी मास्क तर घातलाच पाहिजे पण ५० वर्षे व्यावरील शिक्षकांनी फेसशील्ड वापरणे बंधनकारक केले आहे. वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे, ५०% हजेरीसह वर्ग भरविण्याची सूचना सरकारने केली आहे. या संदर्भात मुख्याध्यापक गजानन सावंत यांनी ‘आपली मराठी’ला अधिक माहिती दिली.

मुलांना शाळेला पाठवण्यास पालकांची संमती असणे आवश्यक आहे. २ नोव्हेंबरपासून शाळेत विध्यार्थ्यांना दुपारी गरम माध्यान्ह आहार देण्यात येणार आहे. अनुदानरहित शाळांतील मुलांना घरून डबे आणावे लागतील. शाळांत पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. एका वर्गात १५ ते २० मुले असावीत, एखादेवेळी कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संपूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन करावे आदी अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांनीही बऱ्याच अवधीनंतर शाळा सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकांचे आम्ही आभार मानले पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या मुलांची, आमची काळजी आम्हीच घेतली पाहिजे असे पालकांनी ‘आपली मराठी’शी बोलताना सांगितले.

एकंदर बेळगावात शाळा सुरु झाल्याने शाळांमध्ये एखाद्या उत्सवाप्रमाणे वातावरण निर्माण झाले होते. बऱ्याच कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजून गेल्या आहेत.

 

Tags: