जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. मराठी भाषिकांच्या हक्काच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजेत असा आग्रह त्यांनी धरला. यावेळी निदर्शकांना संबोधित करताना माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे हिंदुत्व बेगडी आहे. या देशात खऱ्या अर्थाने हिंदुत्व कोणी जोपासले, असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी.

आम्ही सीमाभागातील मराठी भाषिक शिवाजी महाराजांचेच वंशज आहोत, भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. बेळगाव महानगर पालिकेवर डौलाने फडकणारा भगवा ध्वज हटवित आला नाही म्हणून पालिकेची इमारतच नवीन बांधली. त्यासमोर अनधिकृतपणे लालपिवळा ध्वज लावला आहे. तो काढून टाकावा. पालिकेवर भगवा ध्वज लावा किंवा आम्हाला तरी लावण्यास परवानगी द्या, अन्यथा बेळगावात गल्लोगल्ली आणि सीमाभागात गावोगावी भगवा ध्वज फडकावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, जेंव्हा-जेंव्हा आमच्या लोकशाहीपुर्ण मागण्यांसाठी आम्ही जिल्हा प्रशासन, सरकारला निवेदने दिली तेंव्हा-तेंव्हा त्या निवेदनात केराची टोपली दाखवण्यात येते. गेली ६४ वर्षे आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही लोकशाहीपुर्ण शांततापूर्ण मार्गाने आंदोलने करत आहोत. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अन्यथा होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार असाल असा इशारा शेळके यांनी दिला. केंद्र सरकारने बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही काळा दिन पाळतो, कर्नाटक सरकारच्या विरोधात नव्हे. जोपर्यंत आम्हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काळा दिन पाळतच राहणार असे त्यांनी ठणकावून सांगितले. 


Recent Comments