सिंदगी पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी धनगर समाजातील हालूमत समाजाला भावनिक आवाहन केले.

सिंदगी विधानसभा मतदार संघातील कोकटनूर येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, घोंगडी कोणीही ओढून घेऊ शकतो. पण लोकर विणून घोंगडी तयार करण्यासाठी क्षमता आणि कौशल्य असावे लागते. त्याचप्रमाणे हालूमत समाजाचा विकास केलेल्यानाच खऱ्या अर्थाने घोंगडी वापरण्याचा हक्क प्राप्त होतो. भाजप सत्तेवर आल्यापासून संत कनकदास यांचे जन्मस्थळ बाड आणि कर्मभूमी कागीनेले यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, या भागात पाटबंधारे योजना, ग्रामीण रस्त्यांची निर्मिती आणि आवास योजनांना सरकार प्राधान्य देत आहे. गरिबांसाठी यावर्षी अतिरिक्त ५ लाख घरे बांधण्याचे ठरविले असून, त्यापैकी ५ हजार घरे सिंदगी मतदारसंघात बांधण्यात येतील. त्याशिवाय अमृत योजनेंतर्गत २ हजार घरे मंजूर करण्यात येतील. १ वर्षाच्या आत सिंदगी मतदारसंघाला एकूण ७ हजार घरे मंजूर करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
यावेळी काँग्रेसवर टीकेची झोड उठविताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, सामाजिक न्यायाचा उदोउदो करणाऱ्या काँग्रेसनेच सामाजिक न्यायाला मूठमाती दिली. घटना लिहीणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देशाने सदा ऋणी असले पाहिजे. मात्र त्यांच्या विरोधात श्रीमंत उमेदवार उभा करून काँग्रेसनेच त्यांचा प्रभाव केला. हालूमत समाज, छोटेछोटे उद्योग करणारे समाज आजही मागास आहेत. त्यांचा तसेच मुस्लिम समाजाचा विकास केवळ भाजपमुळेच शक्य आहे. त्यामुळे भाजपला निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. याप्रसंगी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, सी. सी. पाटील, शशिकला जोल्ले व भाजप नेते उपस्थित होते.


Recent Comments