Kittur

कित्तूर उत्सवाला शानदार सुरुवात

Share

संपूर्ण जिल्ह्यात संचार करून आलेल्या विरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या विरज्योतीचे स्वागत ध्वजारोहणाने करण्यात येऊन २०२१ सालच्या कित्तूर उत्सवाला दिमाखात सुरुवात करण्यात आली. प्रत्येक वर्षी साजऱ्या होणाऱ्या या कित्तूर उत्सवाच्या परंपरेनुसार राणी चन्नम्मा समाधी स्थळापासून सुरु झालेल्या विरज्योतीचे आगमन आज कित्तूर येथे झाल्यानंतर ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले.

खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. चन्नम्मा यांचे कित्तूर येथील राजगुरू संस्थान मठाचे माडीवाले राजयोगीन्द्र स्वामीजी यांच्या सानिध्यात सुरु झालेल्या या कार्यक्रमात आमदार महांतेश दोड्डागौडर, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही., बैलहोंगल उप विभागाधिकारी शशिधर बगली, उपसंचालक गुरुनाथ कादंबर, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री, कित्तूर तहसीलदार सोमलिंगाप्पा हलगी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

विरज्योतीच्या स्वागतानानंतर राजगुरू संस्थान मठाचे माडीवाले राजयोगीन्द्र स्वामीजी यांनी जानपद कलामंडळाच्या कलापथकाला चालना दिली. यावेळी विविध सांस्कृतिक कला सादर करण्यात आल्या. राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या साहसाचा, धैर्याच्या आणि शौर्याच्या गाथा सांगणाऱ्या अनेक कला यावेळी सादर करण्यात आल्या.

शहरातील प्रमुख मार्गांवरून संचार करून विविध कलाकारांचा सहभाग असणाऱ्या मिरवणुकीने साऱ्यांची मने जिंकली. या मिरवणुकीत कित्तूर संस्थानचे गतवैभव आणि शौर्य तसेच साहसाचे वर्णन केले जात होते. जल्लोषी वातावरणात सुरू झालेल्या कित्तूर उत्सवाची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

यावेळी कित्तूर महाद्वार नजीक असलेल्या शूर संगोळी रायन्ना आणि अटनूर बाळाप्पा यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कलमठ गुरुसिद्धेश्वर प्रौढशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या वास्तूप्रदर्शनाचेही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्घाटन केले. यावेळी जिल्ह्धिकाऱ्यांनी कित्तूर उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

या उत्सवात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे विभागीय अधिकारी, ग्रामविकास, पंचायत राज, कृषी, आरोग्य, पशुपालन, फलोत्पादन यासह विविध विभागाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. विविध महिला संघ संस्था, सेवा संघाच्या वतीने याठिकाणी विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचेही आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे.

Tags: