Vijayapura

सिंदगी पोटनिवडणुकीच्या आखाड्यात माजी मुख्यमंत्री

Share

सिंदगी पोटनिवडणुकीच्या आखाड्यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उतरले असून लिंगायत व्होटबँकसह इतर मतेही मिळविण्यासाठी मास्टर प्लॅनसह प्रचार करण्यात आला आहे. सिंदगी मतदार संघात एका पाठोपाठ एक प्रचारसभा घेऊन देशाच्या विकासासाठी भाजपाला मत देण्याचे आवाहन येडियुरप्पांनी केले आहे.

सिंदगी पोटनिवडणुकीच्या आखाड्यात तिन्ही राष्ट्रीय पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी प्रचारासाठी कसून जोर लावला असून आज येडियुराप्पानी भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश भुसनूर यांच्या प्रचारार्थ रणशिंग फुंकले. सिंदगी येथे प्रचारासाठी आलेल्या येडियुरप्पा यांचे व्यासपीठावर आगमन होताच त्यांच्या चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी जोरदार स्वागत केले. यावेळी लक्ष्मण सवदी, गोविंद कारजोळ, एमटीबी नागराज यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना येडियुरप्पा म्हणाले, सिद्धरामय्या आणि एच.डी.कुमारस्वामी हे सध्या भ्रमात आहेत. आरएसएस संदर्भात बोलताना दोघांनाही आनंद होत आहे. त्यामुळे त्यांना बोलूद्या. ते अनावश्यकरीत्या आरएसएसचे नाव घेत आहेत. आरएसएसचे नाव अशा पद्धतीने घेऊन काहीच साध्य होणार नाही. सध्या ते भ्रमात असून यामुळे त्यांना कोणताही फायदा होणार नसून कुमारस्वामी कधी काय बोलतात हे त्यांनाच माहित नसते, असा टोला येडियुराप्पानी लगावलाय. मतदारांना काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे माहित आहे त्यामुळे मतदारच आता योग्य उत्तर देतील, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्याविरोधात नलीन कुमार कटील यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत अशापद्धतीने बोलणे योग्य नसल्याचे मत येडियुरप्पांनी व्यक्त केले.

यानंतर बोलताना येडियुरप्पा म्हणाले, सुरुवातीला काँग्रेस खोटे बोलून सत्त्वर आले. आता प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली २६ राज्यात भाजपाची सत्ता आहे. महिन्याला १२०० प्रमाणे अनेक महिलांना, ज्येष्ठ महिलांना पेन्शन लागू करण्यात आली आहे. आगामी दोन वर्षात सर्व गरिबांना भूमी योजना, पुरग्रस्तांना सहकार्य, कोविडमुळे निधन झालेल्यांना आर्थिक सहकार्य करण्यात येत आहे. दोन हजार कोटी खर्च करून कागीनेले परिसर सुंदररित्या परिवर्तन करण्यात येत आहे. सर्व स्तरातील जनतेल एकसमान न्याय देण्याचे कार्य आमचे सरकार करीत, आहे असे येडियुरप्पा म्हणाले. अशाचपद्धतीने विकास साध्य करायचा असल्यास रमेश भुसनूर यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन येडियुरप्पा यांनी केले.

यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले लक्ष्मण सवदी आणि गोविंद कारजोळ यांनी भाजपाला मत देण्याचे आवाहन केले. देशाचा विकास साधायचा असल्यास भाजपाला मत देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर येडियुरप्पा यांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवसाच्या कालावधीत जोरदार प्रचारासाठी दिग्गज नेतेमंडळी निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार बहुमताने निवडून येण्याचा विश्वास आहे, आता मतदार कुणाला मत देऊन पारडे जड करणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

Tags: