जुन्या मुंबईचा भाग असलेल्या मुंबई कर्नाटकचे नामकरण कर्नाटक कित्तूर असे करण्यात यावे, असा आग्रह राजकीय नेते अशोक पुजारी यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. हैदराबादचे नाव तत्कालीन सुलतानी राजवटीमुळे पडले आहे. तर बसवण्णा यांच्यामुळे कल्याण कर्नाटक असे नाव पडले आहे. त्याचप्रमाणे जुन्या मुंबई कर्नाटकचे नाव कित्तूर कर्नाटक असे करण्यात यावे, अशी मागणी अशोक पुजारी यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत बहुमोल योगदान देणाऱ्यांमध्ये राणी कित्तूर चन्नम्मा तसेच संगोळी रायन्ना यांचा समावेश आहे. याचा विचार करून कर्नाटकातील भागाचे मुंबई कर्नाटक हे नाव बदलून कित्तूर कर्नाटक असे नामकरण करण्यात यावे, असा आग्रह अशोक पुजारी यांनी केला.
यानंतर बोलताना ते म्हणाले, कर्नाटकातील सुवर्णसौध हि केवळ नावासाठी निर्माण करण्यात आली आहे. या सुवर्णसौधमध्ये शासकीय कार्यालये वर्ग करण्यात यावीत, सुवर्ण सौधला उत्तर कर्नाटकातील शासकीय शक्तीकेंद्र म्हणून ओळखण्यात यावे, असा आग्रह देखील त्यांनी केला. कित्तूर कर्नाटक भागाच्या विकासासाठी विकास निगमची स्थापना करण्यात यावी यासाठी बंगळूरमध्ये सचिवालय स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यंदाचे हिवाळी अधिवेशन सरकारने बेळगावमध्ये भरविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी अद्याप अनेक घोषणा, अनेक मागण्या ऐकू येत आहेत. कर्नाटकातील विविध संघटनांचे नेते उत्तर कर्नाटकाच्या विकासाची मागणी करताना दिसत आहेत, आता सरकार मात्र या मागण्यांचा विचार करून पुढील काळात कोणत्या उपाययोजना हाती घेते, हे पाहावे लागेल.


Recent Comments