माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी निवडणुकीच्या वेळी विनाकारण आरएसएसवर आगपाखड करत असून यामुळे काहीच साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिली आहे.

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यात मोरटगी येथे भाजप समावेश कार्यक्रमात सहभागी झालेल्या बी. एस. येडीयुरप्पा यांना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कुमारस्वामी हे विनाकारण निवडणुकीच्या वेळी आरएसएसला ओढत असून हे योग्य नाही. असे करून त्यांना आनंद मिळत असेल, तर त्यांनी नक्की बोलावे. जनता आता जागृत झाली आहे. दोन्ही नेत्यांनी अशापद्धतीने आरएसएसवर टीका केल्यामुळे काहीही साध्य होणार नसून या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वास येडीयुरप्पा यांनी व्यक्त केलाय.
प्रसारमाध्यमांना नुकतीच एका मुलाखतीत प्रतिक्रिया देताना भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी राहुल गांधींविरोधात टीका केली होती. ही टीका त्यांनी का केली हे मलाही माहित नाही. परंतु राहुल गांधी असोत किंवा इतर कुणीही असोत कुणाबद्दलही अशापद्धतीने बोलणे योग्य नसून यासंदर्भात मी नलीनकुमार कटील यांच्याशी चर्चा करेन, असे येडीयुरप्पा म्हणाले.
कर्नाटकातील दोन मतदारसंघासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करण्यात मग्न झाले आहेत. सर्व राष्ट्रीय पक्षांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत जोरदार प्रचार केला आहे. परंतु या निवडणुकीत कोणाचे नशीब चमकेल, कोणत्या पक्षाच्या पारड्यात झुकते माप येईल? आणि जनता कोणाला विश्वासाने निवडून देईल, हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.


Recent Comments